शिवाबद्दल आध्यात्मिक माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

शिव

अनुक्रमणिका

 


शिवाबद्दल आध्यात्मिक माहिती

सूक्ष्म-ज्ञान प्राप्‍तकर्त्या साधकांना शिवाविषयी मिळालेले ज्ञान


सनातनने प्रसिध्द केलेले सात्त्विक चित्र 

`ॐ नमः शिवाय' नामजप

बहुतेकांना देवाबद्दल जी थोडीफार माहिती असते, ती बहुधा लहानपणी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींमुळे असते. अशा अल्प माहितीमुळे त्यांचा देवावरचा विश्‍वासही थोडाफारच असतो. देवाबद्दल जास्त माहिती मिळाल्यास जास्त विश्‍वास निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे श्रद्धा वाढून साधनाही चांगल्या तर्‍हेने होते. महादेव, भालचंद्र अशी शिवाची काही नावे व त्यांचा अर्थ; शिवाच्या डोक्यावरील गंगा व चंद्र, शिवाचा तिसरा डोळा अशी शिवाची वैशिष्ट्ये; विश्‍वाची उत्पत्ती करणारा, त्रिगुणातीत करणारा, असे शिवाचे कार्य; शिवाच्या उपासनेत बेल, पांढरी फुले व भस्म यांचे महत्त्व इत्यादी शिवाबद्दल इतरत्र बहुधा न दिलेली; पण उपयुक्‍त अशी अध्यात्मशास्त्रीय माहिती आज आपण पाहूया.

व्युत्पत्ती व अर्थ
अ. `शिव' हा शब्द वश् या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट, या पद्धतीने तयार झाला आहे. वश् म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाशी आहे. तो स्वत: प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो.

आ. शिव म्हणजे मंगलमय व कल्याणस्वरूप असे तत्त्व.

शिवाची काही इतर नावे

अ. शंकर : 
`शं करोति इति शंकर: ।' शं म्हणजे कल्याण व करोति म्हणजे करतो. जो कल्याण करतो तो शंकर होय.
आ. महांकालेश्वर : अखिल विश्वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव) हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ (महान्काल) आहे; म्हणून याला `महांकालेश्वर' म्हणतात.

इ. महादेव : विश्वसर्जनाच्या व व्यवहाराच्या विचाराशी मूलत: तीन विचार असतात - परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान व परिपूर्ण साधना. हे तीनही ज्याच्यात एकत्र आहेत, अशा देवास देवांचा देव, म्हणजेच `महादेव', असे संबोधतात.

वैशिष्ट्ये

अ. शारीरिक व भौतिक वैशिष्ट्ये

अ १. गंगा :
 ग्रहमालेचा केंद्रबिंदू म्हणजे सूर्य, शरीराचा केंद्रबिंदू म्हणजे आत्मा, तसा प्रत्येक वस्तूच्या चैतन्याचा व पवित्रकांचा (सूक्ष्म चैतन्यकण) केंद्रबिंदू म्हणजे `गँ' होय. `गँ' ज्याच्यापासून गमन करतात असा ओघ म्हणजे गं ग: `गंगा.' शिवाच्या डोक्यातून `गँ' वहातात. यालाच `शिवाच्या डोक्यावरून गंगा अवतरली', असे म्हणतात.
पृथ्वीवरील गंगा नदीत या आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदूषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते; म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली तरी गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे सूक्ष्मातील कळणार्‍यांनाच नाही, तर शास्त्रज्ञांनाही जाणवते.

अ २. चंद्र : शिवाच्या कपाळी चंद्र आहे. ममता, क्षमाशीलता व वात्सल्य (आल्हाद) या लहरी जेथून निघतात त्याला `चंद्र' म्हणतात. म्हणजेच चंद्रमा ही ममता, क्षमाशीलता व वात्सल्य (आल्हाद) या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

अ ३. तिसरा डोळा :
अ. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा व भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्म रूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा व उजवा अशा दोन्ही डोळयांच्या संयुक्‍त शक्‍तीचे प्रतीक आहे, तसेच अतींद्रिय शक्‍तीचे महापीठ आहे. यालाच ज्योतीर्मठ, व्यासपीठ वगैरे नावे आहेत.

आ. शंकर त्रिनेत्र आहे म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो.

इ. योगशास्त्रानुसार तिसरा डोळा म्हणजे सुषुम्नानाडी.

अ ४. नाग 
अ. वेगवेगळे नाग म्हणजे पवित्रकांचे संघ होत. हे बाहेरून नाग दिसत असले, तरी आतून ते एका प्रकारे शिड्याच असतात. उन्नतीसाठी या नागांच्या शेपटीला धरून वर जायचे असते. या नागांचे म्हणजे पवित्रकांचे पालन करून त्यांना हाराप्रमाणे गळयात धारण करणारा'; म्हणून शिवाला `भुजंगपतीहारी' असेही म्हणतात.

अ ५. भस्म : भू-भव म्हणजे जन्माला येणे. अस् - अस्म - अश्म म्हणजे राख. जे जन्माला येते व राखेत जाते, त्याला `भस्म' म्हणतात. भस्म म्हणजे जन्मलेल्याची राख. श्म (स्म) म्हणजे रक्षा, राख आणि शृ - शन् म्हणजे विखुरलेली; म्हणून जेथे राख विखुरलेली आहे, ते स्मशान होय. भस्मातून निघणार्‍या लहरी बहुतकरून आवेगपूर्ण
मृत्यूतून आलेल्या असतात. भस्म सांगते, `अज्ञान सोडा. शरीर खरे नाही. त्यापासून मिळणारे सुख खरे नाही. त्यात अडकू नका.'

आ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये

आ १. महातपस्वी व महायोगी : 
सतत नामस्मरण करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो. खूप तप केल्याने वाढलेले तापमान कमी करण्यासाठी गंगा, चंद्र, साप यांसारख्या थंडावा देणार्‍या वस्तूंचा शिव वापर करतो, तसेच बर्फाच्छादित कैलास पर्वतावर रहातो.

आ २. रागीट : स्वत: करत असलेले अखंड नामस्मरण शिवाने स्वत:च थांबविल्यास त्याचा स्वभाव शांतच असतो; मात्र नामस्मरणात कोणी विघ्न आणल्यास (उदा. मदनाने विघ्न आणले तसे), साधनेमुळे वाढलेले तेज एकदम बाहेर पडते व ते समोरच्या व्यक्‍तीला सहन न झाल्याने तिचा नाश होतो. यालाच `शंकराने तिसरा डोळा उघडून भस्मसात केले', असे म्हणतात.

आ ३. दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास तयार असलेला : समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी कोणताही देव त्याचा स्वीकार करण्यास पुढे येईना. तेव्हा शिवाने हालाहल प्राशन केले व जगाला विनाशापासून वाचविले.

आ ४. सहज प्रसन्न होणारा (आशुतोष)

आ ५. देव व दानव दोघेही उपासक असलेला : बाणासुर, रावण वगैरे दानवांनी विष्णूचे तप केले नाही किंवा विष्णूनेही कोणा दानवाला वर दिला नाही; पण त्यांनी शिवाची उपासना केली व शिवाने त्यांना वर दिला.

आ ६. भुतांचा स्वामी : शिव हा भुतांचा स्वामी असल्याने शिवोपासकांस भूतबाधा बहुधा होत नाही.

कार्य

अ. विश्‍वाची उत्पत्ती :
 शिव-पार्वतीला जगाचे आई-वडील म्हटले जाते. संहाराच्या वेळीच नवनिर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण शिव निर्माण करतो. तो संकल्पाने विश्‍वाची उत्पत्ती करतो.

आ. जगद्‌गुरु : `ज्ञानं इच्छेत् सदाशिवात् । मोक्षं इच्छेत् जनार्दनात् ।', म्हणजे शिवापासून ज्ञानाची व जनार्दनापासून (विष्णूपासून) मोक्षाची इच्छा करावी. शिवाच्या मस्तकातून ज्ञानगंगा सतत वहात असते.

इ. त्रिगुणातीत करणारा : सत्त्व, रज व तम या तिघांना, म्हणजेच अज्ञानाला शंकर एकत्रितपणे नष्ट करतो.

उपासना


अ. भस्म लावणे

अ १. त्रिपुंड्र :
 त्रिपुंड्र म्हणजे भस्माचे आडवे तीन पट्टे. या तीन पट्ट्यांचा भावार्थ म्हणजे ज्ञान, पावित्र्य व तप (योगसाधना), तसेच शिवाचे तीन डोळे.

आ. रुद्राक्षधारण : शिवपूजा करतांना गळयात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी.

बेलाचे महत्त्व

पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील अनाहत(सूक्ष्म) नादातील, अशी दोन तर्‍हेची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके व वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके, अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहातात. कोवळे बिल्वपत्र आहत (नादभाषा) व अनाहत (प्रकाशभाषा) ध्वनी एक करू शकते. तीन पानांतून एकत्र येणारी शक्‍ती आपल्याकडे यावी यासाठी बिल्वपत्र वहातांना पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवतात. या तीन पवित्रकांच्या एकत्रित शक्‍तीने त्रिगुण कमी होण्यास मदत होते.

महाशिवरात्री
माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्‍त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी काताचा संकल्प करावा. सायंकाळी शास्त्रोक्‍त स्नान करावे. भस्म व रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावी. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ व मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वत:च्या मस्तकावर ठेवावे क्षमायाचना करावी. चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात. त्यांना `यामपूजा' म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, धोत्रा, आंबा व बेल यांची पत्री वहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावे. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. (पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते.) ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्‍ती करावी. बारा, चौदा किंवा
चोवीस वर्षे कात केल्यावर त्याचे उद्यापन करावे. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, अध्यात्मशास्त्र - खंड ४४ `शिव')
शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृतींविषयी सनातनच्या साधकांना ईश्‍वरी कृपेमुळे मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळे उपासकाला त्या देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यास मदत होते. शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयी सनातनच्या साधकांना ईश्‍वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान पुढे तक्‍त्यात दिले आहे. या व यांसारख्या विविध कृतींमागील शास्त्र सनातनची ग्रंथमालिका `धर्मशास्त्र असे का सांगते ?' यात दिले आहे.
टीप १ - महाशिवरात्रीच्या दिवशी सोडून अन्य प्रसंगी शिवाला केवडा वहात नसल्याचे सांगितले आहे. असे असतांना शिवाच्या उपासनेत केवड्याच्या गंधाची उदबत्ती व अत्तर वापरावे, असे येथे सांगितले आहे. यामागील
शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे आहे - `केवड्यामध्ये ज्ञानलहरी प्रक्षेपण करण्याची क्षमता जास्त असते. केवडा ज्ञानशक्‍तीच्या स्तरावर मारक रूपी कार्य करत असल्याने त्याला पूर्णत: लयकारी म्हटले आहे. पूजाविधी हा
लयकारी शक्‍तीशी संबंधित नसल्याने शक्यतो शिवाच्या पूजेत केवडा वापरत नाहीत; परंतु `वाईट शक्‍तींच्या त्रासांच्या निवारणाचा उपाय' म्हणून मात्र केवड्याच्या पानाचा उपयोग केला जातो. या दृष्टीने केवड्याच्या
गंधाची उदबत्ती व अत्तर वापरण्यास सांगितले आहे.' - (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.८.२००५, सकाळी १०.४४)


 


शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्याची पद्धत

शृंगदर्शन म्हणजे नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे.
शृंगदर्शनाची योग्य पद्धत
वामहस्ती वृषण धरोनि । तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि ।। - श्री गुरुचरित्र, ४९.४४
सविस्तर अर्थ : नंदीच्या उजव्या बाजूला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) व अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावेत. दोन्ही शिंगे व त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे. शृंगदर्शनाचा भावार्थ नंदीच्या वृषणाला हात लावणे म्हणजे, कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. शिंग हे अहंकार, पौरुष व क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे, अहंकार, पौरुष व क्रोध यांवर ताबा ठेवायला शिकणे.
शृंगदर्शनाचे फायदे 
१. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज पेलवता येणे : `शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्‍तीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्‍या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्‍तीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्‍तीची सात्त्विकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्‍या शक्‍तीशाली लहरी पेलवणे व्यक्‍तीला शक्य होते. नंदीच्या शिंगांतून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरिराला अचानक कंप सुटणे यांसारखे त्रास होऊ शकतात.'

२. शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍तीचा झोत अधिक प्रमाणात कार्यरत होणे : `उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने तयार होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर
अधिक लाभ होतो. नळीमधून वारा सोडला असता त्याचा वेग व तीकाता अधिक असते, तर याउलट पंख्याचा वारा सर्वत्र पसरतो. वरील मुद्रेमुळे नळीप्रमाणे कार्य होत असल्याचे जाणवते. या मुद्रेमुळे शिवाच्या पिंडीतून
येणारा शक्‍तीचा झोत अधिक प्रमाणात कार्य करतो.'

३. `अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्‍तीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.' - कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 


पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहाणे

पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची पद्धत
शिवाकडून येणार्‍या शक्‍तीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला थेट शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍तीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी जास्त नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो. या कारणासाठीच सर्वसाधारण व्यक्‍तीने पिंडीचे दर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहावे.
(वरील तत्त्वानुसार श्रीविष्णु वगैरे देवतांच्या देवळांत देवतेची मूर्ती व तिच्यासमोर असणारी कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे राहून / बसून देवतेचे दर्शन घेऊ नये, तर कासवाच्या प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून दर्शन घ्यावे.)
५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी असलेल्या भक्‍तात देवाकडून येणार्‍या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता असते व त्यामुळे त्या लहरींचा त्याला त्रास होत नाही. अशा भक्‍ताने देवाचे दर्शन समोरूनच घ्यावे. यामुळे त्याला देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी सहजपणे ग्रहण करता येतात.

 


सनातनच्या साधिकेने बिल्वपत्राचे केलेले `सूक्ष्म-परीक्षण'

१. `बिल्वपत्राकडे बघितल्यावर ते त्रिगुणात्मकतेचे प्रतीक असल्याचे जाणवले.
२. शिवतत्त्वाची अनुभूती : बिल्वपत्रातून खूप थंड लहरी येत होत्या. बिल्वपत्रामध्ये शांतीची स्पंदने जाणवत होती, तर त्याच्या बाजूच्या भागातून शक्‍तीची ऊर्जात्मक स्पंदने जाणवत होती. या दोन्ही अनुभूती बिल्वपत्रातील शिवतत्त्वामुळे आल्या.
३. बिल्वपत्रामुळे ध्यान लागण्यास मदत होणे : बिल्वपत्राच्या देठातून चैतन्याची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती व त्यामुळे ध्यान लागण्यास (मन एकाग्र होण्यास) मदत होत असल्याचे जाणवले.
४. अनाहत नादाची अनुभूती येणे : माझ्या मनाला अनाहत नादाची जाणीव होत होती व तो नाद सूक्ष्मातून ऐकूही येत होता.' - कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


 


सनातन-निर्मित `शिवाची सात्त्विक नामपट्टी'

अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे व त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी किनार यांनी युक्‍त असलेल्या त्या त्या देवतेच्या नामपट्ट्या सनातन बनवते. या नामपट्ट्या त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक आकर्षित व प्रक्षेपित करतात. शिवासहित विविध देवतांच्या मिळून ८० हून अधिक नामपट्ट्या आतापर्यंत सनातनने तयार केल्या आहेत.

 

 


महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाने ज्ञान देणे

`महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतो. त्यामुळे अनेक जीव त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.

- ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ४.२.२००५, दुपारी १.२५ ते २.५७)
शिवपिंडीची कार्ये

अ. ज्ञान, भक्‍ती व वैराग्य या लहरींचे प्रक्षेपण करणे :
 शिवपिंडीतून सत्त्वप्रधान ज्ञानलहरी, रजोप्रधान भक्‍तीलहरी व तमप्रधान वैराग्याच्या लहरी प्रक्षेपित होत असतात. महाशिवरात्रीला हे प्रक्षेपण ३० टक्क्यांनी वाढते.

आ. चैतन्य, आनंद व शांती या सूक्ष्म-लहरींचे प्रक्षेपण करणे : शिवपिंडीतून चैतन्य, आनंद व शांती या सूक्ष्म-लहरींचे प्रक्षेपण होत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी हे प्रक्षेपण २५ टक्के जास्त प्रमाणात होते. त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेणार्‍यांचे सूक्ष्म-देह शुद्ध होऊन त्यांची आवश्यकतेनुसार सूर्य किंवा सुषुम्ना नाडी जागृत होते. तसेच त्याच्या देहांची सत्त्वगुण व चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते. शिवपिंडीत असलेल्या शिवाच्या निर्गुण तत्त्वामुळे व प्रक्षेपित होणार्‍या शांतीच्या लहरींमुळे शिवपिंडीजवळ गारवा जाणवतो आणि मन शांत होते.

इ. दर्शन घेणार्‍या जिवाला आवश्यकतेप्रमाणे तारक-मारक तत्त्व मिळणे : 
शिवपिंडीत शिवाचे निर्गुण व निर्गुण-सगुण तत्त्व आणि तारक व मारक तत्त्व यांचा संगम झालेला असतो. त्यामुळे दर्शन घेणार्‍या जिवाला आवश्यक ते तत्त्व मिळते. शिवपिंडीतून मारक शक्‍ती प्रक्षेपित होतांना तेथील तापमान वाढते व आनंद जाणवू लागतो, तसेच तारक शक्‍ती प्रक्षेपित होतांना वातावरण शीतल असते व आनंद आणि शांती यांचा अनुभूती येते.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी २.५० ते ३.४४)

शिवाने विश्रांती घेण्याची वेळ म्हणजे `महाशिवरात्री' 
भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी व देवता यांच्यामध्ये एक वर्षाचे अंतर आहे. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)

महाशिवरात्रीला उपासना केल्यामुळे वाईट शक्‍तींचा दाब कमी होणे 
भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. `शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्‍वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्या वेळी शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्‍तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्‍तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम आपल्याला म्हणावा तितका जाणवत नाही.' - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)
प्रदक्षिणा 
शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्हणजे नाला जातो, त्याला सोमसूत्र म्हणतात. प्रदक्षिणा घालतांना डाव्या हाताने जायचे आणि अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी ऊर्फ नहाळ (शाळुकेचा पुढे नेलेला स्रोत) असते, तेथपर्यंत जाऊन तो न ओलांडता परत फिरायचे आणि पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. हा नियम शिवलिंग जर मानवस्थापित किंवा मानवनिर्मित असेल तरच लागू असतो; स्वयंभू लिंगास तसेच चल लिंगास (घरातील लिंगास) हा नियम लागू नाही. शाळुंकेच्या स्रोताला ओलांडत नाहीत, कारण तेथे शक्‍तीस्रोत असतो. तो ओलांडतांना पाय फाकतात आणि वीर्यनिर्मिती व पाच अंतस्थ वायू यांवर विपरीत परिणाम होतो. देवदत्त व धनंजय वायू आखडतात. मात्र ओलांडतांना स्वत:ला आवळून ठेवले, म्हणजे नाड्या आखडल्या, तर परिणाम होत नाही. पन्हाळी ओलांडतांना आपल्या पायाची घाण तिच्यात पडली, तर तीर्थ म्हणून ते पाणी प्राशन करणारे भाविक आजारी पडतील; म्हणून पन्हाळी ओलांडत नाहीत, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना वाटते !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शिव')

 


महानंदीच्या आशीर्वादामुळे साधकाला शिवाकडून ज्ञान मिळणे

शिवाबद्दल सूक्ष्म-ज्ञान प्राप्‍तकते साधक श्री. राहुल कुलकणी यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.

मनातील प्रश्‍न : मला ज्ञान कोण देतो व का ?
आतून मिळालेले उत्तर : तुला शिवाकडून ज्ञान मिळत आहे; कारण तू मागील काही जन्मांपूर्वी महानंदीची सेवा केली होतीस. त्या वेळी महानंदीने `तुला शिवाकडून ज्ञान मिळेल', असा आशीर्वाद दिला होता. नम्रता, लीनता व शरणागत भाव ज्यात असतो तो नंदी, तर नंदीचे मारक रूप म्हणजे महानंदी !

मनातील प्रश्‍न : नंदी व महानंदी यांमध्ये फरक काय ?
आतून मिळालेले उत्तर : नंदी म्हणजे जो शिवाच्या पुढे उभा आहे व ज्याच्यामध्ये नम्रता, लीनता आणि शरणागती हा भाव असतो, तर महानंदी म्हणजे नंदीचे मारक रूप होय.

ईश्‍वरप्राप्‍तीची ओढ व महानंदीच्या आशीर्वादामुळे शिवाकडून ज्ञानप्राप्‍ती होणे
मनातील प्रश्‍न : 
हे ज्ञान मला देण्याचे कारण काय ?
आतून मिळालेले उत्तर : तुला ईश्‍वरप्राप्‍तीची ओढ असून मागील काही जन्मांपूर्वी तू महानंदीची सेवा केली होतीस. त्याबद्दल तुला मिळालेल्या अनेक आशीर्वादांपैकी एक म्हणजे भगवान शिवाकडून तुला होत असलेली ज्ञानप्राप्‍ती. तुला शिवाकडून मिळालेले बाकीचे वर काळानुसार सांगीन.

गुरूंनी जिवाला आवश्यक ते ज्ञान देऊन त्या माध्यमातून ईश्‍वराकडे नेणे
मनातील प्रश्‍न : 
मला युद्धाच्या संदर्भात किंवा धर्माच्या संबंधातच ज्ञान का मिळते ?
आतून मिळालेले उत्तर : `प्रत्येक जिवाची आध्यात्मिक उन्नती कशामध्ये आहे', हे गुरुच ठरवत असतात. त्यानुसार प.पू. डॉक्टर त्या जिवाला (म्हणजे जीवात्मा अवस्थेत) ते ते ज्ञान देऊन त्या माध्यमातून कार्य करवून घेतात व ईश्‍वराकडे नेतात.

नामाची व नामाशी संबंधित असलेल्या देवतेची निर्मिती `ॐ' मधून झाली असल्यामुळे वेगवेगळे नामजप एकच असल्याचे वाटणे
मनातील प्रश्‍न :
 प्रत्येक नामजप हा वेगवेगळा नसून सर्व नामजप एकच आहेत, असे वाटण्याचे कारण काय ?
आतून मिळालेले उत्तर : प्रत्येक नामजपाची, तसेच नामाशी संबंधित असलेल्या देवतेची निर्मिती `ॐ' मधूनच झालेली असल्यामुळे हे वेगवेगळे नामजप एकच आहेत.

मनातील प्रश्‍न : प्रत्येक जिवामध्ये `ॐ' आहे, म्हणजे काय ?
शिव : प्रत्येक जिवाच्या अंत:करणातील अंत:प्रेरणा म्हणजेच `ॐ' होय.

जिवावस्थेतून बाहेर आल्यावर जीवात्म्याला ईश्‍वरप्राप्‍तीची ओढ निर्माण होणे
मनातील प्रश्‍न : 
जीवात्म्याला ज्ञानप्राप्‍तीची इच्छा का निर्माण होते ?
आतून मिळालेले उत्तर : ज्या वेळी जीवात्मा जिवावस्थेतून बाहेर येतो, म्हणजेच तो मायेची बंधने तोडून बाहेर येतो, त्या वेळी त्याला ईश्‍वराकडे जाण्याची ओढ निर्माण होते. ईश्‍वरासंबंधी तसेच ईश्‍वराने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंविषयी त्याला ओढ निर्माण होते. `त्याच्या मनात केवळ `ईश्‍वरप्राप्‍ती करणे' हीच इच्छा असल्याने त्याचेच ज्ञान प्राप्‍त व्हावे', असे त्याला वाटते. त्याच जिज्ञासेपोटी तो प्रत्येक गोष्टीतील ज्ञान प्राप्‍त करण्याचा प्रयत्‍न करतो.

ईश्‍वरी ज्ञानाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी जिवाने ईश्‍वरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास व गुरुसेवा करून ज्ञान प्राप्‍त करण्याचा प्रयत्‍न करणे आवश्यक असणे, त्यामुळे सूक्ष्म-ज्ञानरूपी चैतन्याचा, तसेच ग्रंथांच्या माध्यमातून संतांच्या संकल्पांतील चैतन्याचा त्या जिवाला लाभ होऊन तो जीव ईश्‍वराकडे ओढला जाणे

मनातील प्रश्‍न :
 ईश्‍वराकडे वळलेला जीव पुन्हा मायेकडे ओढला जाणार नाही, याची शाश्वती काय ?
आतून मिळालेले उत्तर : अशा जीवात्म्याला दोन्ही गोष्टींविषयी ज्ञान मिळण्यास सुरुवात होते, उदा. ईश्‍वराने केलेल्या मायेच्या व्यावहारिक व ईश्‍वरी तत्त्वाच्या ज्ञानाचे त्याला मार्गदर्शन होते. या ज्ञानानुसार जीवात्मा पुन्हा मायेतील गोष्टींमध्ये अडकू शकतो किंवा ईश्‍वराकडेही जाऊ शकतो. याच टप्प्यातून पुढे जाणे महत्त्वाचे असते. या अवस्थेत ईश्‍वरी ज्ञानाचा लाभ जास्तीतजास्त व्हावा; म्हणून जिवाने ईश्‍वरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे व गुरूंच्या पाद्यपूजनाचा अभ्यास (गुरुसेवा) करून त्याचे ज्ञान प्राप्‍त करण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. त्यानुसार प्रयत्‍न केल्यास अशा जिवाला सूक्ष्म-ज्ञानरूपी चैतन्य, तसेच ग्रंथांच्या माध्यमातून संतांच्या संकल्पातील चैतन्याचा लाभ होतो व तो जीव ईश्‍वराकडे ओढला जातो. हेच चैतन्य त्याच्या अंतर्यामी विराजमान होते. (श्री. राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून, ५.१२.२००५, सकाळी ११.३० ते १२)
 


साधकांच्या अनुभुति
 

शिवतत्त्वाशी संबंधित अनुभूती
`बिंदू, चांदणी, तारे, ज्योत व काजवे दिसणे, म्हणजे शिवतत्त्वाची अनुभूती येणे. या तेजतत्त्वाच्या अनुभूती आहेत.
१. बिंदू : हा शिवतत्त्व दर्शवतो.
२. चांदणी : हिची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. ही शिवाची शीतलता दर्शवते.
३. तारा : याची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. हा शिवाची शीतलता तेजस्विता दर्शवतो. तारा हा ब्रह्मतत्त्वही दर्शवतो.
४. ज्योत : हिची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. ही शिवाची शांती दर्शवते. ही आत्मानुभूतीची दर्शक आहे.
५. काजवा : याची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. हा शिवाची तेजस्विता प्रखरता दर्शवतो.' - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

शिवाची मानसपूजा करतांना हिमालयातील कैलास पर्वतावर बसून शिवपूजा करत असल्याचा भाव ठेवल्यावर स्वत: शिव असल्याचे वाटून मन निर्विचार होणे
१२.८.२००६ रोजी पहाटे जाग आल्यावर मी शिवाची मानसपूजा करून शिवाचा नामजप करण्यास सुरुवात केली. त्या वेळी `मी हिमालयातील कैलास पर्वतावर बसून शिवपूजा करत आहे', असा भाव ठेवून मानसपूजा केल्यावर माझे ध्यान लागून `मी शिव आहे', असे मला वाटले. तेव्हा माझे मन निर्विचार झाले होते. - श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी, सांगली

मच्छिंद्रनाथांच्या उपासनास्थळी जातांना ते दत्तोपासक असूनही `आज शिवतत्त्वाचा लाभ होणार', असा विचार मनात का आला, ते लक्षात येणे, तेथे त्रिशूळ दिसणे व तेथे सर्वत्र व्यापून असलेल्या ॐकारात स्वत:विलीन झाल्याचे जाणवणे 
९.९.२००६ रोजी मच्छिंद्रनाथांच्या उपासनास्थळी जाण्यास निघतांना माझा `महामृत्यूंजयाचा' मंत्रजप आपोआप सुरू झाला. `आज मला शिवतत्त्वाचा लाभ होणार आहे', असा विचार माझ्या मनात आला; मात्र `नवनाथ हे दत्तोपासक आहेत, तर मग शिवतत्त्वाचा लाभ कसा होणार', असा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. देवळात पोहोचल्यावर तेथील माहिती वाचतांना कळले की, या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकरराने त्यांना दर्शन व आशीर्वाद दिला होता. त्यामुळे या क्षेत्री शंकराचेही अस्तित्व आहे. यामुळे `माझ्या मनात आलेला विचार योग्यच होता', हे लक्षात आले. देवळामध्ये प्रवेश केल्यानंतर माझे मन निर्विचार झाले. नंतर मला डोळयासमोर `त्रिशूळ' दिसला व ॐ काराचा जप मनात सुरू झाला. `तेथे सर्वत्र ॐ कारच व्यापून आहे', असे जाणवले व मी त्या ॐ कारात विलीन होत असल्याचे जाणवले. - श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन आश्रम, कुडाळ.

ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करत असतांना गांधीलमाशांनी त्रास देणे व प्रार्थना केल्यावर गांधीलमाशा निघून जाणे
महाशिवरात्रीच्या दिवशी विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावले होते. तेथे सर्व साधकांना नामजप व प्रार्थना यांची आठवण करून देणे आणि ग्रंथ वितरण करणे, अशा सेवा माझ्याकडे होत्या. त्या वेळी ५ ते ६ गांधीलमाशा तेथे येऊन फक्‍त माझ्याभोवतीच फिरू लागल्या. त्यातील १ गांधीलमाशी मला जोरात चावली. मी ग्रंथप्रदर्शन केंद्राच्या बाहेर पडल्यावर त्या निघून जात; परंतु मी ग्रंथप्रदर्शन केंद्राच्या आवारात प्रवेश केल्यावर त्या पुन्हा माझ्याभोवती फिरू लागत. मला त्या सेवा करू देत नव्हत्या. त्यानंतर मी प.पू. डॉक्टर व उपास्यदेवता यांना प्रार्थना केली, `या माशा मला चावल्या, तर सहन करण्याची शक्‍ती तुम्ही मला द्या.' त्यानंतर मी गांधीलमाशांना प्रार्थना केली, `मला गुरुसेवा करायची आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. मी सेवा करणारच आहे.' अशी प्रार्थना केल्यानंतर त्या अचानक नाहीशा झाल्या. त्यानंतर त्या पुन्हा आल्या नाहीत व पूर्ण दिवसभर सेवा करतांना मला कोणताही त्रास जाणवला नाही. - सौ. तेजश्री पावसकर, अंधेरी, मुंबई.

ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी विभूती फुंकरल्यानंतर जिज्ञासूंची गर्दी वाढणे
महाशिवरात्रीच्या दिवशी कॉटनग्रीन येथील शिवमंदिरात साधकांनी ग्रंथप्रदर्शन लावले होते; परंतु तेथे कोणीही जिज्ञासू येत नव्हते. ग्रंथ वितरण केंद्रावर विभूती फुंकरल्यावर पुढील १० ते १५ मिनिटे जिज्ञासूंची गर्दी वाढत असल्याचे २-३ वेळा अनुभवले. - कु. स्वाती बळे, वडाळा, मुंबई

आश्रमात खड्डा खणत असतांना तेथून शक्‍ती व चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवणे, ती शक्‍ती शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीप्रमाणे जाणवणे व आश्रमाच्या कोणत्याही भागात खड्डा खणल्यास अशीच शक्‍ती जाणवणार असल्याचे जाणवणे 
आश्रमातील स्वागतकक्षाच्या कोपर्‍यात दोन ते अडीच फूट खोल खड्डा खणायचा होता. ती सेवा मी करत असतांना दीड फूट खोल खड्डा खणल्यावर मला तेथील मातीतून शक्‍ती व चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.
जसजसा खड्डा खोल खणत गेलो, तसतसे प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीचे प्रमाण वाढू लागले. त्या वेळी माझी सेवा भावपूर्ण होत होती. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जशी शिवाच्या पिंडीतून शक्‍ती प्रक्षेपित होते, त्याप्रमाणे शक्‍ती बाहेर पडत असल्याचे मला जाणवत होते. `आश्रमाच्या कोणत्याही भागात खड्डा खणल्यास, तेथे अशीच शक्‍ती जाणवेल', असे मला जाणवले. - श्री. जगदीश पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


 


हिंदूंनो, आपल्या `शिव' देवतेची विटंबना रोखा !

भक्‍तांना असह्य करणारी शिव-पार्वती यांची `हुसेन'कृत विटंबना !


नग्न  पार्वती

डोके नसलेला शिव व अर्धनग्न पार्वती 

नग्न गंगा व यमुना
शिव म्हणजे मंगलमय, कल्याणस्वरूप सदाशिव तत्त्व ! अखिल हिंदूंच्या भावभक्‍तीचे प्रतिक असलेले सर्वशक्‍तीमान दैवत ! शैवभक्‍तीची किर्ती त्रैलोक्यात व सप्‍तलोकांत दिगंत आहे; पण भूलोक त्याला अपवाद आहे. भूलोकावर शिव-पार्वती यांची नग्न चित्रे रेखाटली जातात. हे सर्व अश्लील व बिभत्स चाळे शिवभक्‍तीचा महिमा गाणार्‍या भारतवर्षात चालतात. गावोगावी शैवमंदिरे व पदोपदी शिवभक्‍त असलेल्या, बारा ज्योतिर्लींगांचे वास्तव्य असलेल्या
पुण्यभू भारतात म.फि. हुसेन यांच्यासारखे हिंदुद्वेष्टे चित्रकार कुंचल्याच्या साहाय्याने हिंदूंच्या भावभक्‍तीच्या चिंधड्या उडवतात. हिंदूंच्या भावभक्‍तीची ही विटंबना वर्षानुवर्षे सुरू रहाते, तेव्हा हिंदु मनावरील अपमानाचा हा घाव आणखी दुखरा होतो. भक्‍तांना असह्य करणारी शिव-पार्वती यांची ही `हुसेन'कृत विटंबना !

ख्रिस्त्यांकडून हिंदु धर्माबाबत अमेरिकेत केला जाणारा अपप्रचार

हिंदूंनो, शिवाविषयी अभद्र प्रचार राजरोसपणे सुरू असतांना शिव प्रसन्न होईल का ?

शिवाच्या जननेंद्रियाची पूजा करणारे हिंदू - एक प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र
अमेरिकेतील प्रख्यात गणल्या गेलेल्या वृत्तपत्रांपैकी एक `न्यूयार्क टाईम्स' या वृत्तपत्राने अमरनाथ यात्रेकरूंबाबत विचार मांडतांना म्हटले आहे, `हिंदु लोक (शिवाच्या) जननेंद्रियाची पूजा करण्यासाठी अमरनाथाची यात्रा करतात.' याबाबत आपली प्रतिक्रिया काय ?, असे विचारल्यावर न्यूयॉर्क टाईम्सच्या प्रतिनिधीने सांगितले की, शिवाला लयाची देवता मानले जाते. लयाची देवता समजल्या जाणार्‍या अमरनाथ येथील शिवलिंगाची, म्हणजे शिवाच्या जननेंद्रियाची हिंदु लोक पूजा करतात. तेथील (अमेरिकेतील) जनतेला शिवाची ओळख अशीच करून देण्यात आली असून, या देवाला त्यांच्यासमोर त्याप्रमाणेच सादर केले जात आहे.
(संदर्भ : पोप्स, सेंट्स, कार्डिनल्स, आर्चबिशप्स, बिशप्स, पूर्णत: सुधारित द्वितीय आवृत्ती, पृष्ठ ३. लेखक : मानोज रखित)

हिंदूंच्या देवतांबाबत संकेतस्थळावरून केला जाणारा अपप्रचार
शिव हा नशेत रहाणारा, शिवलिंग म्हणजे शिवाचे वासनापूर्तीसाठी ताठरलेले लिंग, शक्‍ती ही वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देणारी, तर काली ही दुष्ट आणि रक्‍तपिपासू देवता !
http://religion-cults.com/Eastern/Hinduism/hindu11.htm या संकेतस्थळावर हिंदूंच्या देवतांबाबत लिहिलेली माहिती www.IndiaCause.com या संकेतस्थळाने प्रकाशात आणली आहे. आतापर्यंत ७१ लाखांपेक्षा अधिक जणांनी या संकेतस्थळाला भेट दिलेली आहे. (संदर्भ : पोप्स, सेंट्स, कार्डिनल्स, आर्चबिशप्स, बिशप्स, पूर्णत: सुधारित द्वितीय आवृत्ती, पृष्ठ ४. लेखक : मानोज रखित)


`शिव' देवता चित्रपटातील नटाप्रमाणे चितारणे


`शिव' देवता रांगोळीवर मोटारसायकल चालवतांना चितारणे 


`शिव'भक्‍तांनो धर्मशिक्षण घ्या व धर्माभिमानी व्हा !


 


`शिव'भक्‍तांनो धर्मशिक्षण घ्या व धर्माभिमानी व्हा !

महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम समितीकडून भाडेवाढ करून जादा गाड्या (दैनिक सनातन प्रभात, १६.२.२००७)

मुसलमानांना हज यात्रेसाठी विमानसेवेत कोट्यवधी रुपयांची सवलत, तर हिंदूंना धार्मिक यात्रेसाठी २५ टक्के भाडेवाढ !
हिंदूंनो, तुमच्या धार्मिक यात्रांवर `जिझिया' कर लावणार्‍या औरंगजेबरूपी राज्यकर्त्यांना हद्दपार करा !
पुणे, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - महाशिवरात्रीच्या निमित्ताने बनेश्वर, निळकंठेश्वर व सोमेश्वरवाडी या ठिकाणी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे परिवहन सेवेच्या या निर्णयामुळे भाविकांत उत्साह निर्माण होत असतांनाच प्रशासनाने निळकंठेश्वर येथील बससेवेच्या बदल्यात २५ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेऊन भाविकांच्या उत्साहावर पाणी सोडले आहे. (हज यात्रेकरूंना हिंदूंच्या पैशातून विमानसेवेत कोट्यवधी रुपयांची सवलत मिळते, तर हिंदूंचे राष्ट्र असलेल्या भारतात हिंदूंच्या धार्मिक यात्रांना २५ टक्के भाडेवाढ केली जाते. हिंदूंनो या विषमतेच्या विरोधात आपण कधी आवाज उठवणार ? - संपादक) या जादा आकारणीमागचे कारण विचारले असता जनतेसाठीच्या दररोजच्या सेवेतील गाड्या काढून घ्याव्या लागत असल्याचे (विशेष बससेवा) कारण प्रशासनाने सांगितले. स्वागरेट स्थानकाहून पहाटे ३ वाजता निळकंठेश्वर येथे, तर ६.३० वाजता बनेश्वर येथे भाविकांना जाण्यासाठी गाड्या सोडल्या जातील, तसेच सकाळी ६.३० वाजता महापालिका भवन येथून सोमेश्वरवाडीसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवलिंगाच्या दुग्धाभिषेकाच्या धार्मिक कृतीकडे आध्यात्मिक नव्हे, तर मानसिक स्तरावर पहाणारे मंदिरांचे विश्वस्त !
महाशिवरात्रीला मुंबईतील एका शिवमंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेक करतांना दूध अत्यंत थोडक्या प्रमाणात घालावे व उरलेले दूध भाविकांना तीर्थ म्हणून वाटण्यासाठी व्यवस्थापनाकडे जमा करावे', असे भाविकांना सांगण्यात आले. शिवपिंडी हे शिवतत्त्वाचे स्थूल प्रतीक आहे. त्यात शिवतत्त्व आकृष्ट होत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी हे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. पिंडीवर दुग्धाभिषेक केल्यावर त्यात सूक्ष्म शिवतत्त्व मिसळते. असे दूध त्या शक्‍तीने भारित होते. त्यामुळे त्याला तीर्थ असे संबोधन प्राप्‍त होते. मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍यांनी असे तीर्थ जनतेला वाटायला हवे. त्यातून भाविकांना शिवतत्त्वाचा लाभ होईल. त्याऐवजी पिंडीवर न वाहिलेले दूध भाविकांना वाटणे म्हणजे तीर्थ देणे नव्हे. अशा दुधाला अध्यात्मशास्त्रदृष्ट्या तीर्थ म्हणता येत नाही. ते मंदिरात आलेल्या भाविकांना दूध वाटणे होईल. अशा रीतीने विचार केल्यास उद्या कोणी शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करणेही चुकीचे आहे, असे म्हणू लागेल. मंदिराच्या व्यवस्थापकांनी धार्मिक कृतींकडे अशा प्रकारे मानसिक स्तरावर पाहू नये.

सनातनच्या साधकांनो, या जन्मीच `ईश्‍वरप्राप्‍ती' (मोक्षप्राप्‍ती) हे ध्येय उराशी बाळगण्यासाठी प्रथम ईश्‍वराचे भक्‍त होण्याचा कसोशीने प्रयत्‍न करा !
भगवंताचे विष्णुलोक व कैलास येथील अनेक भक्‍त ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेला मदत करणार असणे व सन २०२३ च्या गुरुपौर्णिमेला प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी प्राप्‍त करून मोक्षाला जाणार असणे : भगवंताचे विष्णुलोक व कैलास येथील अनेक भक्‍त २०१० ते २०२३ गुरुपौर्णिमा या कालावधीत ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यात सूक्ष्मातून मदत करणार आहेत. २०२३ सालाच्या गुरुपौर्णिमेला ईश्‍वरी नियोजनानुसार विष्णुलोक व कैलास येथील भक्‍त प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी प्राप्‍त करून मोक्षाला जातील. - विश्वनाथ देवता (श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून, ४.७.२००६ पहाटे ३.४०)


अंनिसवाल्यांना याबाबत काय म्हणायचे आहे ?
कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील `अम्मिभावी' या गावात एक चमत्कार होत असतो. तेथील एका शेतकर्‍याचा बैल दर अमावास्या व पौर्णिमा या तिथींना न चुकता गावातील तळयात स्वत:हून स्नान करतो व ओलेत्याने
श्री शिवबसवेश्वर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालतो. नंतर मंदिरात प्रवेश करून नंदीच्या मूर्तीच्या शेजारी महादेवाच्या पिंडीकडे पहात सायंकाळपर्यंत बसतो. प्रतिपदा ते चतुर्दशीपर्यंत तो गावात व शिवरात फिरतो. पौर्णिमा व
अमावास्या या तिथी त्याला कशा समजतात आणि प्रदक्षिणा व देवळात जाऊन एकचित्ताने बसावयाचे ज्ञान त्याला कोणत्या विधात्याने दिले आहे, हे आश्चर्यच आहे. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी येत्या अमावास्येला किंवा
पुढील पौर्णिमेला या धारवाड तालुक्यातील गावास भेट द्यावी व हा चमत्कार स्वत: पहावा. - श्री. मंगेश सरदेशपांडे, बेळगाव

 शिव हा स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाशी असून तो विश्‍वालाही प्रकाशित करतो !


 


ध्वनिचित्रपट

शिवविषयक आध्यात्मिक माहिती


शृंगदर्शन कसे घ्यावे?


शिवपूजेत काय असावे व काय नसावे?


शिवाला बेल का व कसा वहावा?


शिवपूजेला कुठे बसावे?


शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्हणजे सोमसूत्री का घालावी?


Read more...