होळी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
होळी पौर्णिमा



समानार्थी शब्द : `होळीला महाराष्ट्रात `शिमगा' म्हणतात, दक्षिणेत `कामदहन' म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो. `हुताशनी', असेही होळीला नाव आहे.

स्थान : देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी करतात.

कृती : मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचतात. होळी पेटवण्याकरता जो अग्नी आणतात, तो चांडाळाच्या घरचा आणायचा असतो ! नंतर व्रतकर्त्याने स्नान करून `ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं समस्तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनं अहं करिष्ये ।', असे म्हणून व नंतर `होलिकायै नम: ।', हा मंत्र म्हणून होळी पेटवायची. त्यानंतर होळीची प्रार्थना करायची.

वंदितासि सुरेंद्रेण, ब्रह्मणा शंकरेण च । अतस्त्वं पाहि नो देवि, भूते भूतिप्रदा भव ।।

अर्थ : इंद्र, ब्रह्मदेव, शंकर यांनी तुला वंदन केले आहे. अशा हे देवी, तू आमचे रक्षण करून आम्हाला ऐश्वर्य दे. होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेला वंदन करायचे. ती राख अंगाला लावायची आणि स्नान करायचे, म्हणजे आधी-व्याध यांची पीडा होत नाही. (आधी म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व व्याधी म्हणजे रोग !)

पुराणांतील कथा

१. ढुण्ढा राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. रोग व व्याधी निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरता लोकांनी खूप प्रयत्‍न केले; पण ती जाईना. अखेरीला तिला बीभत्स शिव्या आणि शाप दिले. ती प्रसन्न झाली आणि गावाबाहेर पळून गेली. (भविष्य पुराण)

२. उत्तरेमध्ये ढुण्ढा राक्षसीऐवजी पुतनेला होळीच्या रात्री पेटवतात. होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात व त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पुतनेचे दहन करतात.

३. दक्षिणेतील लोक कामदेवाप्रीत्यर्थ हा उत्सव करतात. भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधीत होते. त्या वेळी मदनाने त्यांच्या अंत:करणात प्रवेश केला. आपल्याला कोण चंचल करतो आहे, म्हणून शंकरांनी डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. त्या मदनाचे दहन होळी पौर्णिमेला दक्षिणेत करतात. होळी म्हणजे मदनाचे दहन आहे. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.

होळीच्या सणात शिव्या देण्याचे चुकीचे मानसशास्त्र : होळीच्या सणामध्ये आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी वाईट शिव्या देतात. ते काही आधुनिकांना बरे वाटत नाही; पण यात मानसशास्त्र आहे. शब्दांचा मनावर एक प्रकारचा फाजील ताण असतो, तो निघून जातो आणि मन स्वच्छ होते. घाण पाण्याला गटारे करून वाट देतात, तसे माणसातल्या पशूप्रवृत्तीला धर्मशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक दिवस वाट काढून दिली आहे. होळीच्या सणामध्ये आणि दुसर्‍या दिवशी वाईट शिव्या !... आणि ती बीभत्स वागणूक !! हे विष आहे. रोग बरे करण्याकरता विषाची अत्यंत अल्प मात्रा हवी. अल्प म्हणजे किती तर सुईच्या अग्रावर मावेल एवढी; म्हणजे रोग बरा व्हावा, याकरता विषारी औषधाचा अत्यल्प अंश द्यायचा आणि तोदेखील मोठ्या युक्‍तीने घ्यायचा, बेताने घ्यायचा!'

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक १)

होळी


देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट्रात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला `वसंतोत्सव' अथवा `वसंतागमनोत्सव' म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून कितीही धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच लोप पावलेले नाही. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर तर सहज उठून दिसतात.






होळीविषयक आध्यात्मिक माहिती - वाचण्यासाठी येथे टिचकी मारा
होळीमध्ये होणारे गैरप्रकार - वाचण्यासाठी येथे टिचकी मारा
आदर्श होळी व गैरप्रकार - वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

वरील माहिती इंग्रजी ( English) मध्ये वाचण्यासाठी येथे टिचकी मारा



Read more...